Wednesday, February 2, 2011

माधवराव शिंदे


माधवराव शिंदे (मार्च १०, १९४५ - सप्टेंबर ३०, २००१ ) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. ते १९७१, १९७७, १९८० आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुणा लोकसभा मतदारसंघातून तर १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला. त्यानंतर ते राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला. त्यानंतर ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात नागरी विमानवाहतूक मंत्री आणि मनुष्यबळविकासमंत्री होते. १९९६ साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसबाहेर पडून स्वत:चा मध्य प्रदेश विकास कॉंग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते कॉंग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. सप्टेंबर ३०, २००१ रोजी ते लखनौ येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना त्यांचे विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

जनकोजी शिंदे

 पहिले जनकोजी शिंदे (.. १७४५ - .. १७६१) हे शिंदे घराण्यातील ग्वाल्हेर संस्थानाचे राजे होते. .. १७६१ सालातील पानिपताच्या तिसर्‍या लढाईत त्यांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले मारण्यात आले.

शिंदे घराणे

Monday, January 31, 2011

शिवछत्रपतींची आरती

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या अंगचे सर्व गुण आणि सर्व शक्ती केवळ देशभक्तीच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकर सर्वप्रथम देशभक्त होते आणि नंतर महाकवी, समाजसुधारक, लिपीसुधारक, रणझुंजार नेते होते. सावरकरांचे हे जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या बालपणापासूनच स्पष्ट होत होते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात आर्य संघ या नावाच्या भोजन संघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हटली जावी म्हणून सावरकरांनी श्री शिवाजी महाराजांची आरती लिहिली.
जयदेव जयदेव जय जय शिवराया। या या अनन्यशरणा आर्या ताराया।।आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला। आला आला सावध हो शिवभूपाला।। सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला। करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला?।। श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी। दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी। ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळलता। तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?।। त्रस्त अम्ही, दीन अम्ही शरण तुला आलो। परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो। साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया। भगवन भगवद्गीता सार्थ कराया।। ऐकुनिया आर्यांचा धावा गहिंवरला। करुणोक्तें स्वर्गी श्रीशिवनृप गहिंवरला। देशास्तव शिवनेरी घेई देहाला। देशास्तव रायगडी ठेवी देहाला। देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला। बोला तश्रीमत्शिवनृप की जय बोला।।

आग्र्याहून सुटका

आग्र्याहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वत: आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

मुघल साम्राज्याशी संघर्ष

मुघल साम्राज्याशी संघर्ष

मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगझेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.

शाहिस्तेखान प्रकरण

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.