Sunday, January 23, 2011

मराठे

सतराव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला `मराठा' हा शब्द इतिहासाच्या दृष्टीने जातिवाचक नसून त्यांत महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. असे असले तरी महाराष्ट्रावर राजकीय सत्ता ही मुख्यत्वेकरून `मराठा' जातीने प्रस्थापित केली होती. हे मराठी भाषिक मराठे मूळचे कोण हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मराठा हे नामाभिधान महाराष्ट्र देशापासून आले आहे, का मराठे या येथील रहिवाश्यांमुळे या देशाला महाराष्ट्र हे नांव मिळाले आहे हे सांगणे कठिण आहे. रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शक-द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धांत मांडला होता. पण तो आता त्याज्य ठरला आहे. अर्थात महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमातींचा मराठ्यांच्या उत्पत्तीशी संबंध असावा हे सर्वस्वी नाकारता येणार नाही. मराठ्यांच्या अनेक कुळी देवक अथवा वंशचिन्ह मानणाऱ्या आहेत. खंडोबा आणि भवानी या मराठ्यांच्या प्रमुख देवता या आदिवासी स्वरूपाच्या आहेत.

मराठे आणि महाराष्ट्र यासंबंधीचे संदर्भ कांही परदेशी प्रवाशांच्या वृत्तांत आढळतात. यात अल्‌बेरुनी (इ.स. १०३०) फ्रायर जॉर्डनस (इ.स. १३२६ च्या आसपास), इब्न बतूता (इ,स, १३४०) यांच्या लिखाणारून असे उल्लेख आले आहेत. परंतु राजकीय क्षेत्रावर मराठ्यांच्या उदय खऱ्या अर्थाने सतराव्या शतकातच झाला. मराठ्यांच्या उदयाची कारणे इतिहासकारांनी निरनिराळी दिली आहेत. मराठ्यांच्या प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफ यांच्या मते हा उदय सह्याद्री पर्वतात वणवा पेटावा तसा, अगदी दैवघटित परिस्थितीमुळे झाला. न्यायमूर्ती रानड्यांना मात्र प्रामाणिक प्रयत्न करून मराठ्यांनी आपला उदय करून घेतला असे वाटते. राजवाडे यांच्या मते परदेशी आणि दख्खनी मुसलमानांचे वर्चस्व रोखण्याकरता अहमदनरच्या निजामशहाने मराठ्यांना आपल्या दरबारांत हेतुपूर्वक उत्तेजन देऊन एक `मराठा पक्ष' निर्माण केला, आणि त्यातूनच मराठ्यांचा उदय झाला. भोसले, जाधव, निंबाळकर, मोरे, घोरपडे, माने, घाटगे, डफळे, सावंत, शिर्के, महाडिक, मोहिते इत्यादी मराठे सरदार निजमाशाही अथवा आदिलशाहीच्या चाकरीत असल्याने लष्करी आणि मुलकी प्रशासनाचे त्यांना उत्तम शिक्षण मिळाले होते. मालोजी भोसले (अंदाजे इ.स. १५५२ ते १६०६) हा निजामशाहीत एक छोटासा शिलेदार म्हणून नोकरीस लागला. त्याचा पुत्र शहाजी (१५९९ ते १६६४) याने तर निजामशाही, मुघल आणि आदिलशाही यांच्याकडे नोकरी करून बरेच श्रेष्ठत्व मिळविले होते. मराठ्यांच्या उदयास प्रारंभ मालोजी-शहाजीपासून झाला असे मानण्यास हरकत नाही.

No comments:

Post a Comment